फडणवीसांनी मला पहाटे 3 वाजता फोन केला,मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट
* आचारसंहिता असेपर्यंत मी कायद्याचे पालन करणार, पण
बीड: प्रतिनिधी
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझ्यासोबत बोलायचे नव्हते, पण पहाटे तीन वाजता त्यांनी मला फोन केला होता,असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी नुकताच केला आहे. तर आचारसंहिता असेपर्यंत मी कायद्याचे पालन करणार आहे,पण मी शांत बसणार नाही,असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सगे-सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करू, असे आम्हाला सांगितले होते, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी खोटे बोलून डाव साधला,असा आरोप जरांगेंनी केला आहे.
मुंडेंचे नाव न घेता जरांगेंचा सवाल
मनोज जरांगे म्हणाले की, तुम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, मग गुन्हे दाखल कसे काय होत आहेत? असा सवाल उपस्थित करीत जरांगेंनी अप्रत्यक्षपणे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. पालक म्हणून तुम्हालाच आम्ही जाब विचारणार, असे त्यांनी म्हटले आहे.
गृहमंत्र्यांचा द्वेष खूप भयंकर
मनोज जरांगे म्हणाले की, गृहमंत्री आमच्या विरोधात आकसाने वागत आहेत, माझ्या समाजाविषयी द्वेष व्यक्त होत आहे. त्यामुळे बाकीच्या जाती-धर्माच्या लोकांनी सावध राहिले पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही लढतो आहोत. मात्र गृहमंत्र्यांचा द्वेष खूप भयंकर आहे.
- फडणवीसांकडून सर्व सुरू
मनोज जरांगे म्हणाले की, ज्या जनतेच्या जिवावर सरकार मोठे झाले तेच नेते आमच्यावर अन्याय करीत आहेत. गुन्हे दाखल करीत आहेत. फडणवीस यांनीच हे सगळं सुरू केलं आहे. माझ्या घराला तर नांदेडपासून नोटीस आली. परंतु मी फुटणार नाही आणि हटणार नाही. मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही.